चिखलीतील बेकायदा पार्कींगमुळे सर्वसामान्य नागरिकांना मन:स्ताप!
वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी
![Common citizens suffer due to illegal parking in Chikhli](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Sanjivan-Sangle--780x470.jpg)
चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
चिखली येथील सिटी प्राईड शाळेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज रोडवर लागणाऱ्या बेकायदेशीर ट्रक व इतर वाहनावर त्वरित कारवाई करावी आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सिटी प्राईड शाळा चिखली याच्या बाजूच्या श्री. छत्रपती संभाजी महाराज रोडवरील आकाशवेध सोसायटीपासून लव नेस्ट सोसायटीपर्यंतच्या रोडवर दिवसा आणि रात्रीच्या वेळी अनेक बेकायदेशीर ट्रक आणि इतर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे त्या ठिकाणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महिला भगिनींना त्रास होतो. रहदारीस अडथळा येतो. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस या वाहनाच्या बाजुला बसून अनेक नागरिक याठिकाणी मद्यपीने तसेच इतर बेकायदेशीर गोष्टी करतात.
हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांसाठी उद्योगपती सज्जन जिंदाल यांची मोठी घोषणा!
या रस्त्यावर लागलेल्या बेकायदेशीर वाहनामुळे अनेकवेळा या ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत आणि या ठिकाणी बेकायदेशीर धंदे देखील चालू झालेले आहेत. तरी कृपया त्वरित आपल्या स्तरावरून आदेश होऊन या रोडवर थांबणारी सर्व ट्रक आणि इतर वाहने तात्काळ बाजूला करून संबंधित वाहन मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच, पुढील आठ दिवसांमध्ये या बेकायदेशीर ट्रक आणि वाहनांवर कारवाई न झाल्यास फेडरेशन मार्फत रस्ता रोको केला जाईल, असा इशाराही संजीवन सांगळे यांनी दिला आहे.
सिटी प्राईड शाळेच्या बाजूला असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज रोडवरील आठ सोसायटीच्या समोरच बेकायदेशीर ट्रक आणि इतर वाहने लावली जातात. याबद्दल वारंवार तळवडे वाहतूक शाखेस सांगून देखील कोणतीही कारवाई होत नाही. या रोडवर तसेच शिवरोड तसेच इतर आजूबाजूच्या रोडवर देखील असेच वाण उभे केले जातात. या उभा केलेल्या वाहनामुळे सोसायटीमधील नागरिकांना तसेच महिला भगिनींना प्रवास करताना खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील आहे. यावर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा देऊ मोशी रोडवर फेडरेशन मार्फत रस्ता रोको करण्यात येणार आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.