छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम दर्जेदार व्हावे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
‘सोशल मीडिया’वरील अफवा प्रकरणाची घेतली दखल : महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली मागणी
![Chhatrapati Sambhaji Maharaj's statue work should be of quality: Social activist Maruti Bhapkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Maruti-Bhapkar.jpeg)
पिंपरी: मालवण येथील राजकोट किल्लातील युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेला भ्रष्टाचार व निकृष्ट काम प्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम होवू नये. सदर काम भ्रष्टाचार मुक्त, उत्कृष्ट, दर्जेदार, चिरस्थायी टिकाऊ व्हावे, अशी मागणी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारती भापकर यांनी केली आहे.
याबाबत महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आठ महिन्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले होते. या पुतळ्याच्या कामासंदर्भात झालेले संगणमत भ्रष्टाचार, गैरव्यवहार यामुळे हा महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अपमान झाला. महाराष्ट्राच्या स्वाभिमान, अभिमान आणि अस्मितेला धक्का पोहोचला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या काळजावर वार झाल्याची वेदना आम्ही सहन केली आहे.या घटनेमुळे शिवभक्तांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जाहीर रित्या छत्रपती शिवाजी महाराज व शिवभक्तांची माफी मागितली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मोशी या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुटी भव्य दिव्य पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या सुरुवातीच्या जागेवर कोट्यवधीचा खर्च केला गेला. नंतर ही जागा बदलून मोशी येथील ‘पीएमआरडीए’ च्या प्रदर्शन केंद्राच्या जागेत हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू आहे. तसेच या पुतळ्याचे ब्राँझ धातूमध्ये काम दिल्ली येथे सुरू आहे. या पुतळ्याचे टप्प्याटप्प्याने काम करून त्या कामाचे भाग मोशी येथे आणण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या पहिल्या टप्प्याचे मोचडी (पायाचा)हा भाग मोशी येथे आणण्यात आला आहे. या पायाच्या मोजडीला चिरा (भेगा) पडल्याचे चित्रीकरण करून ते वेगवेगळ्या वाहिन्यांवर दाखवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. यावर आपण प्रतिक्रिया देताना हे काम केवळ चौथर्याचे सुरु असून पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये असे आव्हान केले आहे. आपण या संवेदनशील,गंभीर विषयाबाबत स्वतःहा जातीने लक्ष घालून या कामात कुठलाही गैरप्रकार न होता हे काम उत्कृष्ट,दर्जेदार व ची चिरस्थाई,टिकाऊ होण्याबाबत सतर्क रहावे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यात युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत घडलेली घटना या ठिकाणी घडू नये यासाठी संबंधित ठेकेदार, अधिकारी, मूर्तिकार, इतिहासकार, सरकारी विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत योग्य त्या सूचना व काळजी घ्यावी. त्यांच्याकडून या विषयाबाबत कुठलाही हलगर्जीपणा, कुठलाही भ्रष्टाचार, होणार नाही अशी कायदेशीर लेखी हमी घ्यावी.
– मारुती भापकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.