कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते असतील बंद; वाहतूक विभागाची माहिती

पिंपरी चिंचवड: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर येथे सोमवारी (ता. 6) दुर्गादेवी विसर्जनानिमित्त मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी वाहतूक विभागाकडून काही वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेशबंदी असेल. यात बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग हा पूर्णतः बंद असेल. वाहन धारकांना वाहने घेऊन जाता येणार नाहीत.
नागरिकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र चौकातून उजवीकडे जाऊन काशी विश्वेश्वर चौकामार्गे वाहन धारक जाऊ शकतात. याबरोबरच सृष्टी चौकातून तुळजाभवानी मंदिरा समोरून भैरवनाथ कमानीकडे जाणारा रस्ताही बंद राहणार आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून सृष्टी चौकातून सरळ 60 फुटी रोडने रामकृष्ण मंगल कार्यालय चौकामार्गे वाहनचालकांना जाता येणार आहे.
दरम्यान, सोमवारी मिरवणुकीच्या वेळी नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करावं, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. अशी विनंती सांगवी वाहतूक विभागाने नागरिकांना केली आहे.





