शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांना मिळाली करिअरची दिशा!
करियर मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव; माजी 'क' प्रभाग अध्यक्ष नम्रता लोंढे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी | प्रतिनिधी
आपल्यातील क्षमता काय आहेत, हे ओळखायला शिका. आपली आवड, स्ट्राँग पॉइंट ओळखून करिअर निवडा. करिअर म्हणजे केवळ मेडिकल, इंजिनीअरिंगच नाही तर अर्थशास्त्र, कृषी, बीएस्सी, एमएस्सी, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध क्षेत्रांतही तुम्ही यशोशिखर गाठू शकता असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरची पुढील दिशा मिळाली.
निमित्त होते, इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक आठ मध्ये आयोजित करिअर मार्गदर्शन आणि गुणगौरव समारंभाचे. उपक्रमाचे. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क प्रभागाच्या माजी अध्यक्ष नम्रता लोंढे व राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश लोंढे यांनी केले.
इंद्रायणी नगर परिसरातील विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर कोणते करिअर निवडावे. कोणत्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी. यासाठी करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेले आयआयबी इन्स्टिटयूटचे महेश लोहारे यांनी करियर मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष संभाजी पडवळ, मोहन वाघुले, विठ्ठल नाना वाळुंज, नामदेवराव घोलप, बाबुराव लोंढे, संदीप बेंडूरे उपस्थित होते.
इंद्रायणी नगर परिसरातील विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळावी यासाठी करियर मार्गदर्शन तज्ञांकडून केले गेले. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील केला जातो. आजच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी नक्कीच दिशा मिळाली.
– नम्रता लोंढे, माजी अध्यक्ष, क प्रभाग.