चिखली-तळवडेतील रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी २६ व २७ ऑक्टोबरला शिबीर
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी : चिखली व तळवडे भागातील ७ रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी महापालिका नगररचना विभागाकडून २६ व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे हे गेले वर्षभर चिखली व तळवडे भागातील ७ रस्त्यांचे आगाऊ ताब्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी मनपातर्फे २६ व २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चिखली गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली तसेच तळवडे गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
मौजे चिखली व तळवडे येथील मंजूर विकास योजनेतील खालीलप्रमाणे ७ रस्त्यांच्या आगाऊ ताब्याची कार्यवाही भूसंपादन कायदा २०१३ अन्वये जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत सुरू आहे. तर काही रस्त्यांची भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
हेही वाचा – ‘मराठा आरक्षणावरून दिवाळीआधी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२ मी/१८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १३७० मीटर).
- चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४मी व ३०मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २०३० मीटर).
- चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी. पी. रस्ता (रस्त्याची लांबी २२५० मीटर).
- चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २००० मीटर).
- तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रुंद उर्वरित रस्ता (रस्त्याची लांबी ४०० मीटर).
- तळवडे येथील तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १९५० मीटर).
- तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.००मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता (रस्त्याची लांबी २१०० मीटर). या रस्त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रशासनाचे आवाहन..
रस्ता बाधित मिळकतधारकांना पिंपरी-चिंचवउ महापालिकेकडे टी.डी.आर. / एफ.एस.आय. चे बदल्यात आगाउ ताबा देणेसाठी ७/१२ उतारा व मोजणी झाली असल्यास मोजणी नकाशा सोबत आणावा व रु. १००/- प्रपत्र शुल्क भरावेत. आपली जागा रस्त्याने बाधित होत असल्याची खात्री झाल्यानंतर जागेवरच प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ देणेत येईल. आपला टी.डी.आर./ एफ.एस.आय. चा रितसर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार टी.डी.आर./ एफ.एस.आय. मनपाकडून देण्यात येईल. भूसंपादन कायद्यान्वये निवाडा जाहीर झाल्यास टी.डी.आर. / एफ.एस.आय. ला पर्याय उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा मोबदला देय होईल. चिखलीतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी श्री. बनपट्टे : 9922502240 आणि तळवडेतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी श्री. गवळी : 9423506531 यांना संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.