ब्रेकिंग न्यूज : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या ‘त्या’ यादीत राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांचे नाव?
![Breaking News: NCP's Moreshwar Bhondwe's name in 'that' list of Governor-appointed MLAs?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/moreshwar-bhondve-pcmc.jpg)
मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शिफारस यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रावेत येथील माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाचा समावेश आहे. अशा प्रकारचे राज्यपालांच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यपालांनी ६ आमदारांची नावं सुचवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पत्र बनावट असल्याचा राजभवनकडून खुलासा करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं पत्र बनावट असल्याचं समोर आले आहे. राजभवनानं एका वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचे असल्याचं या पत्रात लिहिण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ नावांची यादी दिली होती. मात्र, अद्याप या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. दरम्यान, आज एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्राबाबत राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. ‘ते’ पत्र बनावट आहे. राज्यपालांकडून १२ पैकी ६ आमदारांची नावे दिल्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु तसे काहीही नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले यात पत्रात काही नावे सूचविण्यात आली आहेत. यामध्ये वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांचा समावेश आहे. या सहा जणांची शिफारस केली आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे पत्र कोणी सोशल मीडियावर फिरवले. या पत्रामागे कोणाचा हात आहे? आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
नाना पटोले काय म्हणतात?
पत्रावर राज्यपाल भवनाची सही आहे, थप्पा आहे, त्यामुळे राजभवनाबाहेर राज्यपालांच्या नावाने काही खेळी खेळल्या जात आहेत का? त्या पद्धतीच्या काही गडबडी होत आहेत का, कोणाला आमदार बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पत्रावरचा शिक्का आणि सही तपासून त्यात आर्थिक घोटाळे आहेत का, याचं स्पष्टीकरण समोर आलं पाहिजे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं. १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार करुन गेल्या दोन वर्षांपासून त्याची प्रतीक्षा सुरु आहे. पण आता हे बनावट पत्र बाहेर येत असेल तर त्याची गांभीर्याने चौकशी होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र…