गुटखा वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी l प्रतिनिधी
गुटखा विक्रीसाठी त्याची वाहतूक करून एका टपरी चालकाला विकला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी करावाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 58 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजता कासारवाडी येथील नवमहाराष्ट्र चौकात करण्यात आली.
मनीष रमेश लाल गजवानी (वय 41, रा. काळेवाडी), कैलास श्रीबेदीलाल चौरसिया (वय 45, रा. कासारवाडी, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसालाची वाहतूक केली. तो गुटखा त्याने आरोपी कैलास याला विकला. आरोपी कैलास याची कासारवाडी येथे कैलास पान शॉप नावाची टपरी आहे. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 58 हजार 740 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.