पिंपरी-चिंचवड प्रभाग रचनेबाबत राज्यपालांकडे भाजपाचे विकास मडिगेरींची तक्रार!
![BJP's Vikas Madigeri's complaint to Governor regarding Pimpri-Chinchwad ward formation!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Vilas-Madigeri-Pcmc.jpeg)
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC Election) प्रशासनाने आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीची केलेली प्रभागरचना नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने केली आहे. प्रभागरचना करताना त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करता प्रभाग तयार करण्यात आल्याची तक्रार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली आहे. तसेच ही संपूर्ण प्रभागरचना रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.
महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करत आव्हान दिले आहे. या याचिकेमुळे महानगरपालिकेच्या अडचणीत वाढ झाली असून येत्या 8 जून रोजी महानगरपालिकेला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच विलास मडिगेरी यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्राद्वारे त्यांच्याकडे तक्रार केली आहे.
मडिगेरी यांनी राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध होण्याच्या 3 महिन्यापूर्वी 25 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वातील प्रभाग क्रमांक 8 चे तीन भागात चुकीच्या पद्धतीने मोडतोड होणार अशी लेखी तक्रार अपणाकडे व राज्य निवडणूक (PCMC Election) आयोगाकडे केली होती. तरीही त्याची दखल न घेता त्या प्रमाणे प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने कळविल्याप्रमाणे हरकत नोंदवून व सुनावणीत बाजू मांडल्यानंतर ठोस बदल झाला नाही. जैसे थे परिस्थिती आहे. नियमबाह्य पद्धतीने या प्रभागाची रचना मोड तोड करून करण्यात आली. प्रभागरचना बनविताना गोपनियतेचा भंग व राजकीय हस्तक्षेप झाला, असे माझे मत आहे.