ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

आस्मानी संकटात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जपली माणुसकी!

रहाटणीतील पूरस्थितीत राम मंदिरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धाव; स्वतः घटनास्थळी थांबून बचावकार्याला दिला वेग

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

संततधार मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने रहाटणी परिसरातील ऐतिहासिक राम मंदिरात पूराचे पाणी शिरले. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे मंदिर परिसरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेक भाविक अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची सूत्रे हाती घेतली.

पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून श्री. काटे यांनी तात्काळ महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला आणि अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असतानाही त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचाव मोहिमेवर लक्ष ठेवले.

शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन पथकाने बोटी आणि आवश्यक सुरक्षा साहित्याच्या साहाय्याने मंदिरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. तसेच परिसरातील इतर धोकादायक ठिकाणांचाही आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

हेही वाचा –  “प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राला आवाहन

या वेळी श्री. काटे यांनी नागरिकांना नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे सतर्क असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी आम्ही चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत.”

या संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देण्यापुरते न थांबता स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याला दिशा दिल्याने रहाटणी परिसरातील नागरिकांनी श्री. शत्रुघ्न काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आस्मानी संकटाच्या काळात दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना यामुळे शत्रुघ्न काटे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नागरिकांच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीच नाही. पूरस्थितीवर प्रशासनासोबत आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संपर्क साधावा. संकटाच्या या काळात आम्ही प्रत्येक नागरिकासोबत खंबीरपणे उभे आहोत.”

— शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button