मोठी बातमी : बाळासाहेबांची शिवसेना-भाजप महापालिका निवडणूक एकत्रित लढविणार : खासदार श्रीरंग बारणे
![Big news: Balasaheb's Shiv Sena-BJP will jointly contest municipal election: MP Srirang Barane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Barane-780x470.jpeg)
पिंपरी: पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविणार आहे. त्याबाबतचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील विकास कामांना गती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांचा ‘सीएम’, ‘डीसीएम’ दरमहा आढावा घेणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजित विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना व भाजपची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.18) पार पडली. या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहूल कुल, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बैठक होणार होती. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.
याबाबतची माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि विकास कामांबाबत बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर विकासाला अधिक गती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात कायमच राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले. परंतु, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील बारामतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्या तुलनेत जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाकडे पवारांचे लक्ष राहिले नाही. त्यामुळेच नागरिकांनी सन 2017 मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपकडे दिली होती. आता राज्यात युतीचे सरकार आले आहे. राज्य सरकारच्या जास्तीत-जास्त योजना, निधी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळावा. त्यादृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या समन्वयासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पूर्वी एक बैठक झाली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे धोरण ठरविले जाईल”, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विकास कामांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दरहमहा आढावा घेणार…
पुणे जिल्ह्यात प्रशासकीय अधिका-यांची नियुक्ती करताना दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घ्यावे. त्यांना विश्वासात घेवूनच अधिका-यांची नियुक्ती करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह दरमहा विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. दोन्ही पक्षाच्या समन्वयासाठी भाजपचा एक आणि शिवसेनेच्या एका पदाधिका-यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवून आढावा घेत राहतील. त्यामुळे वेगाने विकास कामे मार्गी लागतील. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकोपा राहिल.
दिवाळीनंतर होणार बैठक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”पुणे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी दिवाळीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे नेते यांच्यासोबत आणखी एक बैठक घेतली जाईल. लोकप्रतिनीधींच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल. विकासात्मक कामांच्या संदर्भात बैठकीत चर्चा केली जाईल. त्यात रखडलेल्या कामांबाबत मार्ग काढण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली जाणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विकासकामे वेगात होण्यासाठी लक्ष ठेवून रहावे. स्थानिक नेत्यांनी समन्वय ठेवून काम करावे”.