पर्यावरण संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर व्हावा – महापौर उषा उर्फ माई ढोरे
![Bicycles should be used in daily life for conservation of environment - Mayor Usha alias Mai Dhore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-27-at-1.28.28-PM.jpeg)
पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश देण्यासाठी “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली”चे आयोजन
पिंपरी | पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा तरी करावा. इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा.
जेणेकरून प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल, असे मत पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी च्या वतीने “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२” चे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी सकाळी ६ वा. नाशिक फाटा ते बीआरटीएस रस्त्यावरील कल्पतरू सोसायटी येथून चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जग बदलले आहे. सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहेत. असे असले तरी आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो, असे सांगत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी, जैवविविधता समिती अध्यक्षा तथा नगरसेविका उषाताई मुंढे, प्रभाग अध्यक्ष सागर आंघोळकर, टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रमोद ओंबासे, बापू गायकवाड, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जवाहर ढोरे, यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
सायक्लोथॉन स्पर्धेसाठी २ हजार हून अधिक सायकलप्रेमींनी नोंदणी करून सहभाग घेतला. सहभागिंना प्रमाणपत्र व मेडल देवून गौरविण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी योगाचे सादरीकरण केले. तसेच, झुंबा खेळाचा सर्वांनी आनंद घेतला. दरम्यान, मराठी भाषा दिनानिमित्त किरण गायकवाड यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.
पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्न तसेच पर्यावरणपुरक बनविण्याकरीता शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२”चे आयोजन करण्यात आले होते. “पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन रॅली २०२२” नाशिक फाटा ते बीआरटीएस रस्त्यावरील कल्पतरू सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ, पिंपळे गुरव पासून वाकड मुंबई – बैंगलोर पश्चिम बाहय वळणावरील पुलाखालून पुन्हा त्याच मार्गाने कल्पतरू सोसायटी, नाशिक फाटा पुलाजवळ, पिंपळे गुरव अशी पार पडली. महापालिकेमार्फत वेबसाईट, फेसबुक, सारथी ऍ़प व इतर विविध सोशल माध्यमांद्वारे नागरिकांना / सायकल प्रेमी तसेच जास्तीत जास्त सायकलस्वारांनी सायक्लोथॉन रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सायक्लोथॉन रॅली अनुषंगाने शहरातील अविरत श्रमदान संस्था, इंडो ॲथलेटीक सोसायटी निगडी, वृक्षवल्ली संघटना, पिंपरी चिंचवड सायकल क्लब,पर्यावरण प्रेमी संस्था, सायकल प्रेमी संस्था व इतर सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.