भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार – ॲड. नितीन लांडगे
![Bhosari: Wrestling Training Center will be inaugurated by Devendra Fadnavis - Adv. Nitin Landage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220103-WA0069.jpg)
पिंपरी | भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे आणि संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे उद्घाटन २६ जानेवारी २०२२ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती कामे तातडीने पुर्ण करावीत अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.भोसरी सर्व्हे क्रमांक एक येथे गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे बहुतांशी सर्वच काम पुर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पुर्ण करुन उद्घाटन करण्याच्या दृष्ठिने इतर सर्व कामे पुर्ण करावीत. या ठिकाणी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.
यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.भोसरी येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईत यापुर्वी १७३ मंडईचे गाळे होते. आता आकर्षक रचनेसह पर्यावरण पुरक नविन संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलात १८८ मंडईचे गाळे विकसित करण्यात आले आहे. येथे तळमजल्यावर २९, पहिल्या मजल्यावर ३१ आणि दुस-या मजल्यावर ३१ असे एकूण ९१ वाणिज्य गाळे उभारण्यात आले आहेत. येथे लिफ्टची व्यवस्था असून विद्युत, पाणी पुरवठा, आरोग्य आणि अग्निशमन अशा सर्व सुविधा पुर्ण झाल्या आहेत.
या गाळ्यांच्या वितरणाची तयारी प्रशासनाने पुर्ण केली आहे. या मंडई व संकुलनाचे देखील २६ जानेवारी २०२२ रोजी उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.