आवास योजनेच्या च-होली, बो-हाडेवाडीतील लाभार्थ्यांनो स्वहिस्स्याची रक्कम शुक्रवारपर्यंत भरा, अन्यथा लाभ रद्द होणार
![Beneficiaries of Cha-Holi, Bo-Hadewadi of Awas Yojana should pay their dues by Friday, otherwise the benefit will be canceled.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/home-loan3-1-1-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये च-होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा 10% रक्कम भरण्यासाठी 15 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, ज्यांनी स्वहिस्सा भरला नाही. त्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी शुक्रवार (दि.28) पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत स्वाहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे.
या योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी एकुण 3 हजार 664 सदनिका बांधण्यात येते आहे. त्यापैकी बो-हाडेवाडी येथे 1288 व च-होली येथे 1442 असे सदनिका वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रकल्पा मध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत. ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला 10% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात 28 जानेवारी 2022 पर्यंत येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन 28 जानेवारी 2022 पर्यंत स्वाहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिला.