घटस्फोट पाहिजे म्हणत वृद्ध दाम्पत्यास मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
तुमच्या नाती पासून मला घटस्फोट हवा, असे म्हणत नात जावयासह सात जणांच्या टोळक्याने वृद्ध दांपत्यास आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. ही घटना दापोडी येथे सोमवारी (दि. 7) दुपारी घडली.
गोट्या उर्फ सुमेध गायकवाड, अनिकेत पठारे, मिलिंद बालसुरे व त्यांचे चार साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मंदा दगडू जाधव (वय 64, रा. जयभिम नगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी या झोपलेल्या असताना त्यांच्या नातीचा पती आरोपी गोट्या गायकवाड त्याच्या साथीदारांसह फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने दरवाजावर लाथा दगडी मारले. फिर्यादी यांचे पती कोण आहे असे विचारण्यासाठी गेले असता पॅरॅलिसिस झालेल्या त्यांच्या पतींना लाथ मारून आरोपीने खाली पाडले. तसेच शिवीगाळही केली. आरोपी गायकवाड याने ‘या म्हातारीला ठेवायचं नाही,’ असे म्हणून जाणीवपूर्वक फिर्यादी मंदा यांचा मृत्यू घडून यावा इतक्या जोराने एक दगड फिर्यादी यांच्या डोक्यावर फेकून मारला.
फिर्यादी यांनी वेळीच डाव्या हाताने तो दगड आडवला. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला जखम झाली. तो दगड अडविला नसता तर फिर्यादी यांचे डोके फोडून त्यांचा जीव देखील गेला असता. फिर्यादी यांचा मुलगा संदीप याच्याही डोक्यात वीट मारून जखमी केले. जाताना आरोपीने आम्ही पुन्हा येणार, त्यावेळी कोणालाच जिवंत ठेवणार नाही, असे जोरात ओरडून दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करीत आहेत.