आरटीओतील बोगस ड्रायव्हिंग चाचण्यांवर निर्बंध येणार!

पिंपरी : ड्रायव्हिंग स्कूल मार्फत येणाऱ्या उमेदवाराची चाचणी संबंधित ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावरच घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनावर यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ड्रायव्हिंग स्कूल चालकांमार्फत पक्क्या वाहन परवानांसाठी घेण्यात येणाऱ्या बोगस ड्रायव्हिंग चाचण्यांवर निर्बंध येणार आहेत.
हेही वाचा – ‘शरद पवार आणि अजित यांनी एकत्र यायला पाहिजे’; सुनंदा पवार यांचं मोठं विधान
मोटर वाहन कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. परिवहन विभागाकडून वाहन चालविण्यासाठी अगोदर शिकाऊ (लर्निंग) आणि नंतर पक्के वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. पक्के वाहन परवाना देण्या अगोदर परिवहन विभागाकडून ड्रायव्हिंग चाचणी घेतली जाते, मात्र बनावट ड्रायव्हिंग चाचणीच्या आधारे वाहन परवाना दिल्याचा अनेक प्रकार समोर आले आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी परिवहन विभागाने सोमवार (दि. १०) रोजी मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन विभागांना दिले आहेत.




