फायनान्स कंपन्यांच्या दहशतीला आवर घाला; रिक्षा चालक-मालकांची मागणी
![Avoid the terror of finance companies; Demand of rickshaw driver-owners](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210807-WA0010.jpg)
पिंपरी – गेल्या दीड वर्षांपासूनसची कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि शासकीय निर्बंधामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. हजारो रिक्षा चालक-मालकांचे रोजचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या मासिक हप्त्यासाठी अपमानास्पद भाषेचा वापर करून रिक्षा जप्त करण्याचे सत्र सुरु केले आहे. फायनान्स कंपन्यांच्या या दहशतीला आवर घालावा, अशी मागणी रिक्षा चालक-मालकांनी केली आहे.
या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच फायनान्स कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या छळाचा पाढा आयुक्तांसमोर वाचला.या वेळी रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, अशोक मिरगे, काशीनाथ शेलार, महाराष्ट्र श्रमिक रिक्षा संघटनेचे संजय गाढवे, राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघाचे बाबासाहेब चव्हाण, महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटनेचे गिरीश साबळे, यांच्यासह हनुमंत जाधव, संजय साळुंखे, किरण चव्हाण, सोमनाथ सुर्यवंशी, देविदास चव्हाण तसेच फायनान्स कंपन्यांकडून छळवणूक झालेले अनेक तक्रारदार उपस्थित होते.
बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून दहशतीचा वापर करुन होणारी कर्ज वसुली थांबवावी. चालू हफ्ते घेऊन सर्व थकित हफ्ते माफ करावे किंवा त्यांना मुदतवाढ द्यावी. तसेच माहिती न देता रिक्षा ओढून घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.