महिला सक्षमीकरण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणारी ‘‘आशा’’
मिशन-PCMC: प्रभाग १६ मध्ये आशाताई भोंडवे यांचा प्रचार दौरा जोरात

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) अधिकृत उमेदवार आशाताई भोंडवे यांनी प्रचारात जोरदार पाऊल टाकले आहे. किवळे येथील शिवशंभो कॉलनी परिसरात झालेल्या प्रचार दौऱ्यात त्यांनी महिलांशी संवाद साधताना “प्रत्येक महिलेच्या हाताला काम आणि सन्मानाचे आयुष्य” देण्याचा संकल्प जाहीर केला. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, निवडणूक आता जनतेच्या हाती गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘होम इंडस्ट्री’चे मॉडेल
आशाताई भोंडवे म्हणाल्या, “महिलांसाठी केवळ मेळावे न भरवता, बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक घरी लघुउद्योग सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तरच कुटुंब सावरते.” त्यांनी आशा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासह महिला सुरक्षालाही तितकेच महत्त्व दिले.

हेही वाचा : चऱ्होली बु. प्रभाग क्र. ३ मध्ये भाजप उमेदवारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा हिशोब जनतेकडून
भोंडवे यांनी गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांवर भाष्य करत ठणकावून सांगितले की, “ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे. पूर्वीच्या नगरसेवकांनी काय कामे केली, हे आता जनतेला उमजले आहे. मी मत मागण्यासाठी नाही, तर तुमच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे वचन देण्यासाठी आलो आहे.”
तरुण आणि ज्येष्ठांसाठी खास योजना
भोंडवे यांनी तरुणांसाठी करिअर संधी आणि ज्येष्ठांसाठी शासकीय योजनांचा लाभ थेट घरापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. भोंडवे कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत स्थानिक नागरिकांनी त्यांना “अजितदादांचा खंदा शिलेदार” म्हणून गौरवले.
“आज बबनराव भोंडवे यांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेताना मला अभिमान वाटतोय. मी स्थानिक कन्या असून लोकांच्या अडीअडचणींची मला पूर्ण जाण आहे. राजकारण माझ्यासाठी समाजसेवेचे साधन आहे. प्रभाग १६ चा कायापालट करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे.”
– आशाताई भोंडवे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 16.
“आम्ही अनेक उमेदवार पाहिले, पण आशाताईंमध्ये आम्हाला आपलेपण वाटते. त्या निवडणुकीपुरत्या नाहीत, तर अगोदरच लोकांच्या सुख-दुःखात धावून येतात. त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता, यावेळी आम्ही त्यांनाच विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
– विठ्ठलराव जगताप, स्थानिक रहिवासी.




