चऱ्होली बु. प्रभाग क्र. ३ मध्ये भाजप उमेदवारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद
डुडुळगाव येथील अडबंगनाथ महाराज मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ

पिंपरी-चिंचवड | पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार वेग घेत असून, आज दिवसभर झालेल्या गाठीभेटींच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रचाराचा शुभारंभ डुडुळगाव येथील अडबंगनाथ महाराज मंदिरात दर्शन व पूजन करून करण्यात आला.
या प्रचारात माजी महापौर व उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष सचिनभाऊ श्रीधर तापकीर, सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार सौ. अर्चनाताई राजेश सस्ते तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील उमेदवार सौ. सारिका रवींद्र गायकवाड यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, व्यापारी व कामगार वर्गाशी थेट संवाद साधत त्यांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
डुडुळगाव, चऱ्होली गावठाण, वाड्या–वस्त्या तसेच अंतर्गत परिसरात दिवसभर प्रचार फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. मागील दहा वर्षांत चऱ्होली बु. परिसरात झालेला सर्वांगीण विकास हा गाठीभेटींमध्ये नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
हेही वाचा : स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला विजयी करा; डब्बू आसवानी
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व नागरी सुविधा यामध्ये झालेल्या सुधारणांमुळे परिसराचा कायापालट झाल्याचे नागरिकांनी आवर्जून सांगितले. “विकास कामांची गती अशीच सुरू राहावी,” अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली.
गाठीभेटीदरम्यान बोलताना नितीनआप्पा काळजे म्हणाले, “चऱ्होलीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली कामे अधिक गतीने पूर्ण करणे हीच माझी जबाबदारी आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मूलभूत सुविधा, दर्जेदार पायाभूत कामे आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारे प्रशासन हेच माझे ध्येय राहील.” या प्रचारादरम्यान चऱ्होली मंडळातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येत्या १६ तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांवर विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा ठाम विश्वास नागरिकांनी गाठीभेटीत व्यक्त केला.
“चऱ्होलीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली प्रत्येक कामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील. मूलभूत सुविधा, सक्षम पायाभूत व्यवस्था आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारे प्रशासन देणे हीच माझी प्राथमिकता असून नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
– नितीन काळजे, माजी महापौर व उमेदवार, प्रभाग क्र. ३, चऱ्होली.




