राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांकडून संतोष साने यांच्यावर प्राणघातक हल्ला
मिशन- PCMC : चिखली मोरेवस्ती प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यास अडथळा

पिंपरी-चिंचवड | चिखली मोरेवस्ती येथील प्रभाग क्रमांक १ मधून सर्वसाधारण जागेसाठी नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष लिंगाप्पा साने यांच्यावर ३० डिसेंबर रोजी गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. संतोष साने हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यश साने व त्यांच्या समर्थकांनी कार्यालयापासून सुमारे २०० मीटर अंतरावर त्यांना अडवले.
यावेळी हल्लेखोरांनी संतोष साने यांच्या हातातील कागदपत्रांची फाईल हिसकावून घेत ती फाडून टाकली. जीवाच्या भीतीने पळ काढत असताना हल्लेखोरांनी पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर लोखंडी रॉड व दगड फेकून वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसेच संतोष साने यांना रक्त निघेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली.
हेही वाचा : महिला सक्षमीकरण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणारी ‘‘आशा’’
संतोष साने हे बौद्ध व आंबेडकरी समुदायाचे असल्याने आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जातीवरून अपमान केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामुळे संतोष साने यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले.
या घटनेप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये हल्ला व दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र राजकीय व सामाजिक संतापाची भावना व्यक्त होत आहे.
“मी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत असताना माझ्या उमेदवारीला घाबरून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. माझे अर्जाचे कागद फाडले, मला मारहाण केली आणि जातीवरून अपमानित करण्यात आले. ही केवळ माझ्यावरची नाही तर लोकशाही, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरची थेट हल्ला आहे. अशा दहशतीला मी घाबरणार नाही. न्याय मिळेपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत माझा लढा सुरूच राहील.”
– संतोष साने, उमेदवार, प्रभाग क्रमांक- 1, चिखली.





