पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्ट्याला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव द्यावे – नगरसेवक शत्रुघ्न काटे
![Artist Katta in Pimple Saudagar should be named after 'Lata Mangeshkar' - Corporator Shatrughan Kate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220210-WA0003.jpg)
पिंपरी | पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्टयाला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.स्व. लता मंगेशकर यांच्या निधनाला अवघे १०० तास उलटले नाहीत तर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी कलाकार कट्टाला स्व.लता मंगेशकर यांचे नाव देण्याबाबत निर्णय घेऊन आदरांजली अर्पण करणारे कदाचित पहिलेच नगरसेवक असावेत.स्व.लता मंगेशकर यांनी कला क्षेत्रात केलेले कार्याची दखल अवघ्या जगाने घेतली होती. त्यांनी लहान मुले, तरुण वर्ग आणि जेष्ठ नागरिक अश्या तिन्ही स्तरावरील रसिक वर्ग निर्माण केला होता.
स्मार्ट प्रभाग अशी ओळख असलेल्या पिंपळे सौदागरमधील शहरातील सर्वात मोठ्या लिनियर गार्डनमधील कलाकार कट्टयाला स्व. लता मंगेशकर यांचे नाव आता लवकरच देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू अशी ओळख बनण्याच्या दृष्टीने शहरातील पहिल्या कलाकार कट्टयाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत मागील दोन वर्षापासून पिंपळे सौदागरमध्ये सुरू आहे.
पाश्चात्य देशातील खुल्या कलामंचच्या धर्तीवर लिनियर गार्डनमध्ये हा ‘कलाकार कट्टा’ उभारण्यात आला आहे. कला तसेच कलाविषयक उपक्रम आणि खुली नाटके व अभिनय शाळा, तसेच प्रायोगिक कार्यशाळा असलेली रंगभूमी असे स्वरूप असलेला हा कट्टा केवळ पिंपळे सौदागरच नव्हे तर शहराचा आकर्षण बिंदू ठरणार आहे.
या कलाकार कट्टयाला भारतरत्न व गानसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांचे नाव देण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काटे व आयुक्त राजेश पाटील यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या संदर्भातील मागणीचे औपचारिक पत्रही शत्रुघ्न काटे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.
शत्रुघ्न काटे यावेळी म्हणाले की, ’लतादीदींच्या कार्यउंचीला साजेसे ठिकाण असलेल्या या कलाकार कट्टयाला दीदींच्या नावामुळे प्रतिभा प्राप्त होईल. तसेच या ठिकाणी लता दीदींचे म्युरल्स निर्माण करण्याचंही विचारात आहे. येथील संगीत, साहित्य, नाटय व कला उपक्रमांमुळे शहरात सांस्कृतिक वैभवाचे एक नवे पर्व उदयास येईल असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.