सिलेंडरमधील गॅस चोरी प्रकरणी एका तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/gas-theft.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरगुती भरलेल्या गॅस सिलेंडर मधून चोरून गॅस काढून तो दुस-या लहान गॅस सिलेंडरमध्ये काढत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी कारवाई करून एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 8) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बोडकेवाडी हिंजवडी येथे करण्यात आली.
अक्षय ज्ञानु कांबळे (वय 26, रा. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील बोडकेवाडी याठिकाणी अवैधरित्या गॅस रिफलिंग होत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता, आरोपी अक्षय हा घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर टाकीतून लहान सिलेंडर टाकीत चोरून गॅस काढत होता. त्याच्याकडून 48 हजार 28 रुपये किमतीचे 13 घरगुती वापराचे गॅस, 12 लहान पितळी रिफिलर, दोन लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रीक वजन काटा तसेच 70 हजार रुपयांची एक मोटारसायकल जप्त केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.