पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो स्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करा : दीपक मोढवे-पाटील
![Arrange parking in metro station area in Pimpri-Chinchwad: Deepak Modhve-Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/5f45bad2-2829-4365-b270-325cd9142bfe.jpg)
- भाजपा वाहतूक आघाडीच्या वतीने मेट्रो प्रशासनाला निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून वाहतूक कोंडीमुक्त रस्ते होतील, अशी आहे. पण, मेट्रोचे काम करीत असताना नियोजित स्थानकांच्या बाजुला पार्किंगची व्यवस्था अद्याप दिसत नाही. आराखड्यानुसार पार्किंगचे नियोजन करावे. ज्यामुळे मेट्रो सुरू झाल्यावर पार्किंगची समस्या उपस्थित होणार नाही, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत पुणे मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी ते दापोडी परिसरात मेट्रोची ५ स्थानके करण्यात येत आहेत. ही स्थानके उभारताना सध्या तरी पार्किंगची कोणतीच सुविधा किंवा मोकळी जागा उपलब्ध दिसत नाही. त्यामुळे भविष्यात मेट्रोचा प्रवास करणाऱ्यांना पार्किंग अभावी गैरसोयीचा सामना करावा लागेल. ही अडचण ओळखून मेट्रो परिसरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था निर्माण करावी, अशी आमची मागणी आहे.
पिंपरीमधून पुण्यात जाण्यासाठी जलद आणि सुलभ सोयीसाठी मेट्रोची व्यवस्थेचा फायदा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या ठिकाणी मेट्रो स्थानके उभारण्याचे काम सुरु आहे. डिसेंबर अखेर मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुण्यात जाण्यासाठी शहरवासीय मेट्रोचा वापर करतील. मात्र, शहरवासीयांना पार्किंगची समस्या भविष्य काळात भेडसावणार असल्याचे दिसते.
मेट्रोचा प्रवास करण्यासाठी मोरवाडी स्थानकापर्यंत नागरिकांना यावे लागणार आहे. शहरातील रावेत, वाकड, निगडी, मोशी आदींसह विविध परिसरातून नागरिक मोरवाडी पर्यंत स्वतःच्या वाहनाने येतील. मात्र, पुढे मेट्रोचा प्रवास करण्यासाठी त्यांना आपले वाहन कुठे उभे करावे? असा प्रश्न उपस्थित राहणार आहे.
प्रवाशांच्या वाहनांची सुरक्षितात हवी…
शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करण्याची खबरदारी नागरिकांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे ही समस्या न येण्यासाठी मेट्रोकडून सुरक्षित आणि प्रशस्त पार्किंगची देखील सुविधा निर्माण करावी. तसेच, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून प्रवाशांच्या वाहनांची सुरक्षितता अबाधित ठेवावी, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.