पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन : आज सायंकाळी, उद्या पाणी पुरवठा विस्कळीत
![Appeal to Pimpri-Chinchwadkars: Water supply disrupted today evening, tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/water-pcmc.jpg)
पिंपरी : रावेत येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनमध्ये अचानक गळती सुरू झाली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तरी आज (दि.२६) आणि उद्या (दि.२७) रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून एक जाहिर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, आज दि.२६/१०/२०२२ रोजी रावेत येथे टप्पा ३ ला पाणीपुरवठा करणारी १४०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाईन अचानक लिकेज झाली आहे. पाणी पुरवठा विभागाने लिकेज दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे अचानक शटडाऊन घ्यावा लागत असून लिकेज दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
या कारणास्तव आज आणि उद्या संपुर्ण शहरात सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. उद्या रात्री पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.