क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
![Another case has been registered against NCB witness Kiran Gosavi in the cruise party case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/kiran-Gosavi-1-e1636701805526.jpg)
पुणे | सध्या राज्यभरासह देशात चर्चेत असलेले क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण प्रकाश गोसावी (वय 36, रा. ठाणे) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने त्याने सव्वादोन लाखांची फसवणूक केली आहे.विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय 33, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 11) सायंकाळी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2015 मध्ये कानडे नोकरी शोधत होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज केले होते. त्याच दरम्यान वेगवेगळ्या जॉब पोर्टल वरून त्यांना नोकरीसाठी ऑफर येत होत्या. 21 मार्च 2015 रोजी कानडे यांना मेल आला. त्यात परदेशात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी असल्याचे नमूद केले होते. त्यासाठी कानडे यांचा बायोडेटा मागवण्यात आला. कानडे यांनी त्यांचा बायोडेटा मेलद्वारे पाठवून दिला.
आरोपी किरण गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे अमिश दाखवले. कानडे यांचा विश्वास संपादन करून नाशिक फाटा कासारवाडी येथे भेटून 30 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन 5 एप्रिल 2015 रोजी किरण गोसावीकडे कानडे यांनी 40 हजार रुपये दिले.किरण गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर कानडे यांनी 20 हजार रुपये पाठवले. वैद्यकीय तपासणीसाठी किरण गोसावी याच्या ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन कानडे यांनी 10 हजार रुपये भरले. वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण दोन लाख 25 हजार रुपये कानडे यांनी आरोपी किरण गोसावी याला दिले. पैसे घेऊन कानडे यांची गोसावी याने आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन म्हणाले, “क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची आणि कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीची पद्धत काहीशी समान आहे. परंतु या प्रकरणात आरोपी तोच किरण गोसावी आहे, याची खात्री अद्याप झालेली नाही. कानडे यांनी किरण गोसावी नावाच्या व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. कानडे यांच्याशी चर्चा सुरु असून त्यातून आरोपीची ओळख पटवून तोच आरोपी असल्यास त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.”