देशाच्या इतिहासातील एक अभिनव व पहिलाच प्रयोग !
अभिनव प्रयोग; “विकसित भारतासाठी विकसित पिढी”चे ध्येय

पिंपरी चिंचवड : स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत १२ जानेवारी रोजी “विकसित भारतासाठी विकसित पिढी” हे ध्येय मनाशी बाळगून बापू एमसीसी, पुणे व सुराज्य शैक्षणिक संकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत कार्यशाळा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत तिसरी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच पुढील २१ वर्षांचा स्वतःच्या आयुष्याचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला. विद्यार्थ्यांनी “माझा प्रवास” या नावाची स्वतंत्र फाईल तयार करून मी आतापर्यंत काय शिकलो, कोणती कौशल्ये आत्मसात केली, पुढे कोणती कला, ज्ञान व कौशल्ये शिकायची, ती कुठून व कधी शिकायची याचे सविस्तर लिखित नियोजन केले.
हेही वाचा – ‘मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा’; आयुक्त श्रावण हर्डीकर
केवळ विचारांपुरते न राहता, पुढील २१ वर्षांचा विकास आराखडा प्रत्यक्ष लिखित स्वरूपात स्वतःजवळ ठेवण्याचा हा उपक्रम देशाच्या इतिहासातील एक अभिनव व पहिलाच प्रयोग ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या माध्यमातून स्वतःला विकसित करून राष्ट्राला विकसित करण्यासाठी मी आजपासून कोणती ठोस कृती करणार यावर आधारित कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. ही कार्यशाळा भोसरी येथील सुराज्य शैक्षणिक संकुलातील विकसित भारत कार्यशाळा केंद्रामध्ये यशस्वीपणे संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
युवा पिढी निर्णायक भूमिकेत
या उपक्रमाचे संकल्पक, सुराज्य शैक्षणिक संकुल, पुणे चे अध्यक्ष व समाजप्रबोधनकार पृथ्वीराज प्रकाश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजची पहिली ते बारावीची पिढी जर सक्षम, विचारशील आणि कौशल्यसंपन्न घडली, तर पुढील २०–२१ वर्षांनंतर हीच पिढी देशाचा सर्वात मोठा कार्यशील आधार ठरेल आणि विकसित भारत घडविण्यात निर्णायक भूमिका बजावेल.”




