महत्त्वाकांक्षी नगरसेवक रवि लांडगेंचा ‘राजकीय संयम’ कमी पडला?
![Ambitious corporator Ravi Landge's 'political restraint' diminished?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/महत्त्वाकांक्षी-नगरसेवक-रवि-लांडगेंचा-‘राजकीय-संयम-कमी-पडला_.jpg)
स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून बगल
पूर्ण क्षमता आणि प्रबळ दावेदार असतानाही संधी हुकली
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते कै. अंकुशराव लांडगे यांचा राजकीय वारसदार, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यासह ‘तीन एम’ अर्थात मॅन, मसल आणि मनी पॉवर असलेले पिंपरी-चिंचवड भाजपाचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांचा ‘राजकीय संयम’ कमी पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक रवि लांडगे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी नितीन लांडगे यांच्यावर शिक्कामोर्तब केले. नाराज झालेल्या रवि लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
भोसरीसह पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नगरसेवक रवि लांडगे यांच्यापाठिमागे कै. अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वलय आहे. लांडगे कुटुंबियांनी भाजपामध्ये निष्ठावंत अशी ख्याती मिळवली आहे.
युवा चेहरा, प्रभावशाली कार्यकर्ता, प्रचंड आक्रमता ही रवि लांडगे यांची बलस्थाने आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये रवि लांडगे यांच्या अतिघाईमुळे राजकीय निर्णय चुकताना दिसत आहेत.
रवि लांडगे यांना राजकीय भवितव्य आहे. आगामी काळात त्यांचे नेतृत्त्व पिंपरी-चिंचवडमध्ये लक्षवेधी ठरणार आहे. महापालिका सभागृहात प्रतिनिधी म्हणून रवि लांडगे यांच्याकडे अवघा चार वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मोठी पदे आणि मानसन्मान मिळवण्यासाठी काहीकाळ संयमाने घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोठी झेप घेण्यासाठी चार पावले मागे जावे लागले, हा निसर्गाचा नियम आहे, याबाबत रवि लांडगे आत्मचिंतन करतील, अशी अपेक्षा आहे.
… या राजकीय घटनांमधून बोध घ्यावा!
राज्यात २०१९ मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिघाई केली. राजकीय संयम ठेवला नाही. पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शपथविधी उरकून घेतला. पण, अवघ्या ८० तासात पायउतार व्हावे लागले. ही घटना भाजपाशीच संबंधित आहे. तसेच, शहरातील दिग्गज नेते आझमभाई पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह कै. अंकुशराव लांडगे यांच्या राजकीय जीवनात कमी-अधिक प्रमाणात पदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्यांनी राजकीय संयम न बाळगता तडकाफडकी निर्णय घेतले. त्यांना राजकीय परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळे रवि लांडगे यांनी राजकीय घडामोडींमधून संयमाचा बोध घेतला पाहिजे.
खासगी भेट, पण मॅसेज राजकीय निघाला…
गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये रवि लांडगे पद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. आमदार महेश लांडगे आणि रवि लांडगे यांच्या राजकीय स्पर्धा आहे, अशा बातम्या येत आहेत. सोशल मीडियावरही त्यादृष्टीने वातावरण निर्माण करण्यात येते. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट रवि लांडगे यांनी घेतली. त्यामुळेही राजकीय धुरळा उडाला. परिणामी, रवि लांडगे यांच्या भाजपा निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. वास्तविक, ‘ती’ भेट खासगी होती, असा दावा लांडगे यांनी केला. पण, त्याचा अर्थ मात्र राजकीय निघाला. भाजपाला धक्का…अशा आशयाचा बातम्या त्या काळात प्रसिद्ध झाल्या. ही बाबत भाजपातील पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आली. त्यामुळे रवि लांडगे यांनी राजकीय संयम ठेवला असता तर कदाचित स्थायी सभापतीपदी त्यांना अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली असती, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.