#covid-19 : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘एचए’ कंपनीला लस निर्मितीची परवानगी द्या – माजी आमदार विलास लांडे
![Increase stops of 'Deccan Queen' at Pimpri, Chinchwad, Akurdi, or start Sinhagad Express for the convenience of employees - Former MLA Vilas Lande](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Vilas-Lande.jpg)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले निवेदन
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढाकार घेण्यासाठी घातले साकडे
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीकडे दिवसाला 5 लाख लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. कंपनीला परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात लसीची निर्मिती होईल. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह, राज्य व देशाला अल्प दरात व अधिक लस मिळतील. त्यामुळे एचए कंपनीला लस निर्मिती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व जेष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी आमदार लांडे यांनी दिली. या बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, खासदार अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट या लोकप्रतिनिधींनी देखील कोणतेही राजकारण न करता देशाला कोरोनामधून मुक्त करण्यासाठी एचए कंपनीला परवानगी मिळावी, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
लांडे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, औषध निर्माण करणारी देशातील पहिली कंपनी असा एचए कंपनीचा नावलौकीक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी पुण्यात असताना त्यांना वेळेवर पेनिसिलिन मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्या मुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पिंपरीत पेनिसिलिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना हिंदुस्थान अँटिबायोटिक (एचए) 10 मार्च 1954 मध्ये सुरू केला. सुरुवातीला पेनिसिलिन निर्माण करणारी कंपनी अशी ओळख होती. नंतर इतर जीव रक्षक औषधे, कृषी आणि पशुचिकित्सा विषयक औषधांची देखील निर्मिती आणि विक्री सुरू करण्यात आली. देशातील गोरगरिबांना अल्प दरात औषधे देण्याचा उद्देश कंपनी स्थापन करण्यामागचा होता. तो उद्देश सफलही झाला.
नंतरच्या काळात बाहेरच्या कंपन्या देशात आल्यामुळे एचए कंपनी डबघाईला आली. मात्र आजही देशाला गरज असताना लस निर्माण करण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. दररोज 5 लाख लस निर्माण करण्याची क्षमता कंपनीकडे आहे. दिवसाला 12 हजार हॅण्ड सॅनिटायझर निर्माण करत आहे. त्यांना परवानगी दिल्यास सध्या लसीचा जाणवणारा तुटवडा कमी होईल. पुरेशा प्रमाणात लस मिळतील. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून नागरिक कोरोनाशी झुंज देतील. कोरोनाला हद्दपार करतील. त्यामुळे लस निर्मितीला परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना माजी आमदार लांडे यांनी केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी एचए कंपनीच्या अडचणी केंद्र सरकारच्या दरबारी वारंवार मांडल्या. या अडचणी सोडवण्यासाठी व कंपनीच्या पुरुज्जीवणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील एचए कंपनीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे जेष्ठ नेते खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती लांडे यांनी दिली.