breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजित पवारांची ‘जनसन्मान’ यात्रा शुक्रवारी मावळात..

यात्रेद्वारे साधणार नागरिकांशी संवाद, आमदार सुनील शेळके यांची माहिती.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी (दि. १६) रोजी मावळ तालुक्यात येत आहे. या यात्रेदरम्यान अजित पवार तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या दोन ठिकाणी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थीशी संवाद साधणार आहेत.

आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिक येथून झाली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. यावेळी मावळ तालुक्यानंतर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात ही यात्रा जाणार असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्वागतासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तुळेगाव दाभाडे येथे सकाळी दहा वाजता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून भव्य मंडप उभारण्यात येत आहे.

हेही वाचा –  ‘..तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार’; आमदार रवी राणा यांचं वक्तव्य

माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजित पवार यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनोंशी ते संवाद साधतील. शेती पंपांवरील वीज बिलमाफी, मावळातील पर्यटनाला गती कशी मिळेल याबाबत अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

मावळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ६६ हजारांहून अधिक माता-भगिनींनी नाव नोंदणी केली. या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान ८० हजार भगिनींना मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरु आहेत. या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने जाहीर केली असून तिची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना पुढे सुरू राहावी, असे वाटत असेल तर विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी महायुती सरकारला निवडून देणे आवश्यक आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये अशी योजना राबविण्याची धमक नसून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास योजना बंद केली जाण्याचा धोका असल्याचा इशारा शेळके यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button