लोकसंवाद : शिरुर लोकसभानंतर आता पिंपरी विधानसभेत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
![After Shirur Lok Sabha, now Pimpri Vidhan Sabha Mahavikas Aghadi 'Bighadi'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/महाविकास-आघाडीत-‘बिघाडी.jpg)
- राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर- शिवसेना समन्वयक जितेंद्र ननावरे आमने-सामने!
- युवा नेते पार्थ पवार अन् खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील सूप्त संघर्षाची चर्चा
पिंपरी । प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील सत्तासंघर्षामुळे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ‘बिघाडी’ निर्माण झाली आहे. त्याची पुनरावृत्ती आता पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये पहायला मिळत आहे.
परिणामी, पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत (२०२२) राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेस महाविकास आघाडीच्या ‘दूधात मिठाचा खडा’ पडणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) वरिष्ठ नेत्यांनी आता पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले पाहिजे. एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना मिळते-जुळते घेण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघात शिवसेनेला मानणारा सुमारे ४५ ते ४९ हजार मतदार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित ताकद मोठी असली तरी स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. कारण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार विलास लांडे आणि शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद यांच्यात सत्तासंघर्ष कायम आहे. त्यामुळे भोसरी मतदार संघात महाविकास आघाडीचे गणित अवघड झाले आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेला मानणारा सुमारे ४० हजार मतदार आहे. सध्या हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण, राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर आणि शिवसेनेचे समन्वयक जितेंद्र ननावरे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. हा वाद अगदी न्यायालयात गेला आहे.
वास्तविक, या वादाला प्रभागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाची किनार असली, तरी चर्चा परिणाम मात्र शहरातील महाविकास आघाडीवर होत आहे. कारण, ननावरे हे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मर्जीतील पदाधिकारी आहेत. बारणे यांच्या उपस्थितीतच ननावरे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. खासदार बारणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (मावळ) राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना पराभूत केले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ‘बारणे विरुद्ध पवार’ हा सुप्त संघर्ष कायम राहीला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारणे राष्ट्रवादीची स्थानिक ताकद कमी करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या ‘गुड बॉक्स’ मध्ये आहेत. २०१९ मध्ये पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असताना स्थानिक नेत्यांच्या असहकार्यामुळे शिलवंत यांना माघार घ्यावी लागली होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांशी कट्टर असलेल्या शिलवंत यांना त्रास देण्याच्या हेतुने शिवसेनेचे स्थानिक नेते रणनिती आखत आहेत, असे जाणकारांचे मत आहे. परिणामी, पिंपरी विधानसभेत शिरुर लोकसभा मतदार संघाप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्हे आहेत.
चिंचवड मतदार संघामध्ये कलाटे-काटे ‘शीतयुद्ध’
२०१९ मध्ये शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदार संघामध्ये अपक्ष निवडणूक लढवली. ‘भाजपा-शिवसेना’ युती असतानाही त्यावेळी कलाटे यांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादीने त्यावेळी चिंचवडमध्ये उमेदवार दिला नाही, तर कलाटे यांना समर्थन दशर्वले. कलाटे यांनी ‘बॅट’ चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. किंबहुना यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवलीही होती. महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवल्यास तिकीटासाठी कुणा एकाचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे काटे- कलाटे यांच्यात आतापासूनच शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्याचा फटका चिंचवड विधानसभा मतदार संघात बसण्याची शक्यता आहे.
शिलवंत धर- ननावरे वाद काय आहे?
महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत नातेवाईकांनी भाग घेतल्याने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द करण्याबाबत माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केलेल्या तक्रारीवर आठ आठवड्यांत काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे विभागीय आयुक्तांना दिला आहे, अशी भूमिका शिवसेना समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. दुसरीकडे, जितेंद्र ननावरे यांना न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ कळलेला नाही. ननावरे दोन वेळा नगरसेवक असताना त्यांच्या सौभाग्यवती माझ्याविरोधात पराभूत झाल्या. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे चुकीची माहिती देवून दिशाभूल करीत आहेत, असा दावा नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे.