जामीनावर सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी पुन्हा चोरी, गुन्हेगार पुन्हा गजाआड
जामीनावर बाहेर सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी एका सराईत गुन्हेगारांनी पुन्हा चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पुन्हा तुरुंगात पाठवले. गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. आरोपीने महागड्या चार गाड्या चोरल्याचे उघडकीस आले आहे. कुणाल उर्फ बाबु प्रल्हाद ठाकुर (वय 21, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक हडपसर परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत होते. याच दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आरोपी कुणाल हा फरार झाला होता. त्यापुर्वी तो 3 मार्च 2022 रोजी दोन वर्षानंतर घरफोडीच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. तसेच, याच काळात त्याने व साथीदारांना एकावर वारकरून खूनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.
दरम्यान या सराईत गुन्हेगाराची माहिती काढत असताना तो आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महागड्या चार गाड्या चोरल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून 2 लाख 50 हजारांच्या 4 गाड्या जप्त केल्या आहेत. कुणाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, कुणाल व त्याच्या साथीदारांवर खूनाच्या प्रयत्नाबाबत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात इतरांना पकडण्यात आले होते. परंतु, कुणाल फरार होता. त्याची माहिती घेऊन त्यालाही जेरबंद केले आहे. चौकशीत त्याने साथीदारांसोबत गुन्हा केल्याचे सांगितले