महापालिकेतील 20 अधिकार्यांची खातेनिहाय चौकशी; चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे होणार सादर!
![Account wise inquiry of 20 officers of the corporation; Inquiry report to be submitted to Commissioner!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pcmc-23.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 20 अधिकारी व कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. गैरवर्तणुक करणे, नियम न पाळणे आदीसह विविध कारणांसाठी ही चौकशी सुरू आहे. चौकशी होईपर्यंत 20 जणांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. संबंधीत समितीद्वारे चौकशीचा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठवून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासन विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.
शासनाचे नियम न पाळल्यास अथवा गैरवर्तणुक केल्यास महापालिकेच्या प्रशासन विभागाकडे तक्रारी दाखल होतात. त्या तक्रारींबाबत शहानिशहा करण्यासाठी राज्य शासनाची समिती नियुक्त केली जाते. या समितीमार्फत खातेनिहाय चौकशी केली जाते. चौकशीचा कालावध सहा महिन्यांचा असतो. त्याचा अहवाल महापालिकेच्या आयुक्तांना पाठविला जातो. त्यानंतर आयुक्तांकडून नियमानुसार कारवाईचा बडगा उभारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 20 जणांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्यामध्ये वर्ग एक पासून चार पर्यंत सर्वांचाच समावेश असल्याचे प्रशासन विभागाने सांगितले. वर्ग 4 मधील अनेक कर्मचार्यांच्या गैरहजेरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वर्ग एक मधील सुमारे दोन जणांची चौकशी सुरू आहे. चौकशी होईपर्यंत संबंधीतांचे निलंबन केले असल्याची माहिती महापालिका प्रशासन विभागाने दिली.
सध्या 20 जणांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशी पर्यंत त्यांचे निलंबन केले आहे. राज्य शासनाच्या समितीद्वारे अहवाल तयार केला जाईल. तो आयुक्तांना पाठविण्यात येईल.
– सुभाष इंगळे, उपायुक्त, प्रशासन विभाग.