रिक्षा व्यवस्थित चालवण्यासाठी सांगत असेलल्या पोलीस महिलेला रिक्षात ओढून गैरवर्तन; तिघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/lady-police.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा चालवत असलेल्या एका रिक्षा चालकाला पोलीस महिलेने रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. त्यावरून रिक्षा चालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलीस महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच रिक्षात ओढून रिक्षा पुढे पळवून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वानऊ वाजता भारतमाता चौक, मोशी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
विश्वदीप भरत मादलापुरे (वय 19), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय 19), सुनील शिवाजी कसबे (वय 20, तिघे रा. बनकरवस्ती, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत पोलीस महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एम एच 14 / एच एम 5771 ) वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवली. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. पोलिसांचे न ऐकता आरोपी पुढे निघून गेले. पुढे भारतमाता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबली असता फिर्यादी पोलीस महिला आरोपींना’मी पोलीस आहे. रिक्षा व्यवस्थित चालवा’ असे सांगत असताना आरोपींनी फिर्यादी यांचा हात पकडून त्यांच्याशी गैरवर्तन करुंत यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी पोलीस महिलेला रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळवून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.