मास्टर माईंड ग्लोबल स्कूलतर्फे आयोजित अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
विविध २५ शाळांमधून ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग : सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मिळाले प्रमाणपत्र
![Abacus and Vedic Mathematics Competition organized by Master Mind Global School receives overwhelming response](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Master-Mind-Global-School-Bhosari-780x470.jpg)
पिंपरी | मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भोसरी येथे ७ वी राष्ट्रीय स्तरावरील अॅबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला शहर परिसरातील २५ शाळांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी या स्पर्धेमध्ये सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
क्रिएटिव्ह कॅलिबर माइंड्स द्वारे मास्टरमाईंड ग्लोबल स्कूल येथे राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेत विविध शहरांमधील विद्यार्थी तसेच विभागातील २५ हुन अधिक शाळांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेचे मूल्यमापन वयोगट आणि स्तरानुसार वेगवेगळ्या गटामध्ये केले जाते.त्याप्रमाणे स्पर्धेत ६०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
हेही वाचा – प्रशांत किशोर यांना अटक, पाटणा पोलिसांची कारवाई
स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ अंकुशराव नाट्यगृह येथे ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्ञानभक्ती स्कूलच्या प्राचार्या नीतू अरोरा तसेच मास्टर माईंड स्कूलच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर आणि फिरोझ खान हे उपस्थित होते.
विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदके, ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर आणि क्रिएटिव्ह कॅलिबर माईंडच्या अध्यक्षा कांचन मुच्छाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.