प्रशांत किशोर यांना अटक, पाटणा पोलिसांची कारवाई

Prashant Kishor | जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे बेमुदत उपोषणाला बसले होते. गांधी मैदान या ठिकाणी त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलं. याच ठिकाणी जाऊन पाटणा पोलिसांनी प्रशांत किशोर यांना अटक केली आहे. पहाटे ४ च्या दरम्यान पोलीस आले आणि त्यांना अटक केली. त्यावेळी जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी कुठलेही उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. पाटणा पोलीस आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये एम्सच्या बाहेर झटापट पाहण्यास मिळाली. गांधी मैदानातील झटापटीनंतर पोलिसांनी प्रशांत किशेर यांना उचललं आणि रूग्णवाहिकेतून AIIMS रूग्णालयात नेलं. त्यानंतर त्यांना नौबतपूर येथे नेण्यात आलं.
BPSC वादात काय काय घडलं?
बीपीएससीद्वारे १३ डिसेंबर रोजी एका परीक्षेचा पेपर लिक झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातला. यानंतर आयोगाने १२ हजार उमेदवारांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी असे आदेश दिले. या आदेशानंतर ४ जानेवारीला शहरातल्या विविध केंद्रांवर नव्याने परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. ९११ केंद्रांवर परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र BPSC च्या परीक्षार्थी उमेदवारांनी समान संधी निश्चित करा असं सांगत सगळ्या केंद्रांवर पुन्हा आंदोलन सुरु केलं. उमेदवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अपक्ष खासदार पप्पू यादव आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला. प्रशांत किशोर यांनी तर उपोषणही सुरु केलं. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.





