श्री गणेश व संत बाळुमामा देवस्थानाच्या वतीने आरती व महाप्रसादाचे आयोजन उत्साहात
![Aarti and Mahaprasad organized on behalf of Shree Ganesha and Saint Balumama Devasthanam with enthusiasm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-15-at-4.55.21-PM-1.jpeg)
देवस्थानचे सर्वेसर्वा नानासाहेब वारे यांच्यावतीने हा आरतीसोहळ्याचे दररोज आयोजन
चिंचवड (अजंठानगर) । महाईन्यूज विशेष प्रतिनिधी ।
अजंठानगर येथील श्री गणेश व संत बाळुमामा देवस्थानाच्यावतीने मंदिरात आरती व महाप्रसादाचे आयोजन दर रविवार व अमावस्येला सायंकाळी 7 वाजता करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील चिंचवड, अजिंठानगर येथील हे एकमेव मंदिर असून, या ठिकाणी नियमितपणे आरतीचे आयोजन करण्यात येते. चिंचवड – अजंठानगर येथील शिवनेरी, संघर्ष हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री संत बाळुमामा देवस्थानचे सर्वेसर्वा नानासाहेब वारे यांच्यावतीने हा आरतीसोहळा मोठ्या उत्साहात दररोज आयोजित केला जातो.
सदर आरती सोहळ्यास अजंठानगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ येथील भाविक घेतात. शेकडो भाविक दररोज या आरती सोहळ्यास उपस्थित राहत असल्याचे देवस्थानचे ट्रस्टी नानासाहेब वारे यांनी सांगितले. येणाऱ्या भाविक भक्तांना प्रसाद म्हणून कण्या, भात आणि आंबिल दिले जाते. कण्या आणि आंबीलचा प्रसाद खाल्ल्यावर येथील भाविकांना वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, असे वैद्यकीय शिक्षण घेणारे अभिषेक साखरे यांनी यांनी सांगितले.
संत श्री बाळुमामांविषयी थोडक्यात…
बाळूमामा हे एक भारतीय धनगर समाजातील एक गूढ, संत योगी होते. लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या सोप्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या व अडचणी सोडवल्या. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील व वर्गातील लोकं अडचणी घेऊन येत होते. बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामांच्या याच विचारांनी प्रभावित होऊन, युवा कामगार सेनेचे सेना प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब वारे यांनी अजंठानगर येथे संत बाळुमामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून, भव्य मंदिर उभारले आहे. या ठिकाणी पुणे जिल्ह्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.