अमळनेरच्या युवकाचे इनोव्हेशन देशात डिजिटल क्रांती घडवणार!
नागरिकांना आधुनिक डिजिटल सोल्यूशन्स, स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी

जयपूर | GrowHo कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, अमळनेर येथील युवा उद्योजक सचिन बिऱ्हाडे यांनी आज राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे (नानाजी) यांची राजभवन, जयपूर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान बिऱ्हाडे यांनी GrowHo Digital Rajasthan Project संदर्भात सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांसमोर मांडली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व डिजिटल सेवांचे संपूर्ण डिजिटायझेशन, ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट डिजिटल सुविधा सक्षम करणे, तसेच शासनाच्या विविध सेवांची नागरिकांपर्यंत जलद, अचूक व प्रभावी डिजिटल पोहोच साधण्यावर भर देण्यात येणार आहे.
GrowHo कंपनी राजस्थान राज्यात घरगुती डिजिटल सेवा, स्मार्ट ग्रामपंचायत प्रकल्प, डिजिटल दस्तऐवज सेवा, तसेच शासन सेवांचे सिंगल-विंडो डिजिटायझेशन यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणार आहे. या अभिनव प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी GrowHo कडे १५० हून अधिक आयटी तज्ञांची कुशल व अनुभवी टीम कार्यरत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशाला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी ती सज्ज आहे.
हेही वाचा : सुस गावात जनसंपर्काचा नवा अध्याय; लहू बालवडकरांचा दोन दिवसांचा उत्साही गाव भेट दौरा संपन्न
राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी GrowHo च्या संकल्पनेचे विशेष कौतुक करत, “राज्यातील डिजिटल सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे नागरिकांना शासनाच्या सेवांचा लाभ सुलभपणे मिळेल,” असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना सचिन बिऱ्हाडे म्हणाले, “GrowHo चे मुख्य ध्येय म्हणजे शासनाच्या सर्व डिजिटल सेवा घराघरात पोहोचवणे, ग्रामीण व शहरी भाग स्मार्ट बनवणे आणि नागरिकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिक सोपा, जलद व प्रभावी करणे.” अमळनेरच्या युवकाने उभारलेल्या या डिजिटल इनोव्हेशनमुळे केवळ नागरिकांना आधुनिक डिजिटल सोल्यूशन्स मिळणार नाहीत, तर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार असल्याने GrowHo प्रकल्पाकडे देशभरातून लक्ष वेधले जात आहे.




