उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत!
राष्ट्रवादीतील समर्थकांची गर्दी : भव्य स्वागत अन् फुलांची उधळण
![A warm welcome for Deputy Chief Minister Ajit Pawar in industrial city Pimpri-Chinchwad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Ajit-Pawar-4-780x470.jpg)
पिंपरी: राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा पवार आज (दि.२५) पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शहरात येत असून भव्य स्वागत अन् सत्कार करण्यात आला. किवळे येथील मुकाई चौकात अजितदादांचे आगमन झाले असून जेसीबीमधून फुलांची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज शुक्रवार (दि.२५) रोजी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. सकाळी १० वाजता ते शहरात आले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल रावेतकरांच्या वतीने मुकाई चौक येथे त्यांचे स्वागत केले आहे.
त्यानंतर वाल्हेकरवाडी येथे त्यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे. चिंचवडमधील चापेकर चौकात चिंचवडकरांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सत्कार होणार आहे. त्यानंतर चिंचवड स्टेशन येथे आणि मोरवाडी चौक येथे अजितदादांचे जंगी स्वागत अन् सत्कार करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख चौकात जोरदार स्वागत झाल्यानंतर अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय बैठक घेणार आहेत. पालिकेचे कामकाज, विविध प्रलंबित प्रकल्प, चालू कामे यांचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्य सरकारशी संबंधित रखडलेली कामे देखील मार्गी लावण्यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेतील. त्यानंतर चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तेथे अजितदादा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा उद्या पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.