Pimpri Chinchwad | दीड महिन्यातच दोनशे कोटींचा महसूल महापालिका तिजोरीत जमा
दहा ते वीस टक्के सवलत, कर सवलतीच्या योजनांचा लाभ घ्या; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन
![A revenue of two hundred crores was deposited in the municipal treasury within one and a half months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Pimpri-Chinchwad-6-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात 25 टक्के मालमत्ता धारकांनी दोनशे कोटी रूपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख 28 हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 30 जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे. मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात 1 लाख 81 हजार 968 मालमत्ता धारकांनी तब्बल दोनशे कोटी 39 लाख रूपयांचा कर भरणा केला आहे.
पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतींचा लाभासाठी त्वरित अर्ज करावेत
शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.
हेही वाचा – पुणे | मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात निर्बध
अशा आहेत विविध ‘कर सवलत योजना’ मालमत्तांचा प्रकार..सवलत मिळणारी टक्केवारी
१) आगाऊ मालमत्ता कर – 5 टक्के
२) महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास – 30 टक्के
३) 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मालमत्तेस – 50 टक्के
४) स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास – 50 टक्के
५) ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्यांना 30 जूनपर्यंत – 5 टक्के
६) जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा करणाऱ्यांना – 4 टक्के
७) स्वयंफूर्तीने माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत मालमत्तांची नोंदणी केल्यास – 5 टक्के
८) इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास – 2 टक्के
९) संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात – 100 टक्के
१०) चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात – 5 टक्के
११) कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना 5 पासून 10 टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटींग तीन ते पाच रेटींगपर्यंत 5 पासून 15 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
असा आला कर..
आँनलाइन – 132 कोटी 92 लाख
रोख – 12 कोटी 14 लाख 64 हजार
धऩादेश – 8 कोटी 6 लाख 51 हजार
आरटीजीएस – 1 कोटी 22 लाख 44 हजार
डीडी – 49 लाख 30 हजार
एनएफटी – 4 कोटी 39 लाख 20 हजार
विविध अँप – 4 कोटी 92 लाख 52 हजार
2024-25 या आर्थिक वर्षात 25 टक्के मालमत्ता धारकांनी तब्बल दोनशे कोटी रूपयांचा कर भरणा केला आहे. तसेच मालमत्ता धारकांनी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींचा मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका.