मावळमध्ये धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/images28629.jpeg)
मावळ | प्रतिनिधी
मावळमध्ये धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलांनी आरडाओरडा केल्याने ही घटना समोर आली. परंतु, यात दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे.
साईनाथ पिराजी सुळे (13) आणि सचिन पिराजी सुळे (10), पिराजी उर्फ खंडू गणपती सुळे (45, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत. मूळ रा. नायगाव वाडी, जि. नांदेड) अशी बुडालेल्या पिता-पुत्रांची नावे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिराजी सुळे हे त्यांच्या दोन मुलांसह कुसगाव येथील धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धबधब्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या प्रवाहात सचिन आणि साईनाथ हे दोघे खेळत होते.
मात्र, पाण्याचा अंदाज न असल्याने ते गाळात रुतले गेले. दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांना साद घातली, आरडाओरडा केला, वडील पिराजी यांनी हे पाहून पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गाळात रुतून तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, धबधब्याच्या शेजारी जनावरे राखणाऱ्या गुराखीला आवाज गेल्याने त्याने स्थानिकांना आवाज दिला. तिघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.
मावळमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये ५०० पेक्षा अधिक मी.मी पाऊस कोसळला असून यामुळे मावळ परिसरातील सखल भागात आणि शेतीमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून भातखाचरे तुडुंब भरले होते. शिवाय, काही ठिकाणी भाताचे पीक आडवे देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.