कोव्हिशिल्ड घेतलेल्या व्यक्तीमध्ये सात महिन्यांपर्यंत 90 टक्के अँटीबॉडीज
पिंपरी चिंचवड | कोरोनाला रोखण्यासाठी सिरमची कोव्हिशिल्ड लस प्रभावी असून दोन डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये सात महिन्यांपर्यंत 90 टक्के अँटीबॉडीज असतात. त्यामुळे अशा व्यक्ती अधिक सक्षमपणे कोरोनाचा मुकाबला करतात, असा दावा पुण्याच्या बीजे शासकीय महाविद्यालये आणि ससून रुग्णालयाच्या अहवालात म्हटले आहे.कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या 558 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता त्यांच्यात 90 टक्के अँटीबॉडीज सापडल्याचे पुण्याच्या बीजे शासकीय महाविद्यालये आणि ससून रुग्णालयाच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्यानंतर लस घेतलेल्यांमध्ये अँटीबॉडीज टिकून राहण्याचा कालावधीदेखील वाढला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण पूर्ण केलेल्यांमध्ये तीन महिन्यांनंतर 96.77 टक्के अँटीबॉडीज आढळल्या तर सात महिन्यांनंतर याचे प्रमाण 91.89 टक्के इतके आढळले. दरम्यान, केवळ पहिला डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देता येणार नाही. दोन डोस घेतल्यांनाच बुस्टर डोस घेता येईल, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.