90 % शहर खड्डेमुक्त
![90 % city pothole free](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-10-at-4.32.12-PM.jpeg)
महापालिका प्रशासनाचा दावा : उर्वरित खड्डे भरण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले असून नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन उर्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याबाबत महापालिकेच्या वतीने दक्षता घेण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांबाबत असणारी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्सने खड्डे भरले आहेत. इतर ठिकाणी मुरूम,खडी तसेच काँक्रिटने करून खड्डे बुजविण्याचे काम देखील करण्यात आले आहे. परंतु, पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिका यंत्रणेचे ते खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्याचे तसेच गणेश विसर्जनासाठी खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच ज्या भागात पाणी साचते तेथे वेळेत उपाययोजना कराव्यात, याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापालिका यंत्रणेचे खड्डे बुजवण्याचे काम निरंतर सुरु असून खड्ड्यांसंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला जात असल्याची माहिती संबंधित आधिका-यांनी दिली.