आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात
![726th Sanjeevan Samadhi Ceremony of Sant Shrestha Gyanoba Mauli in Alandi with great enthusiasm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/fc2fe51d-26e6-4c5f-9d18-850c5f552220-780x470.jpeg)
आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. निर्बंधमुक्त सोहळा पार पडत असल्याने आळंदीत लाखो भाविक आल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक वारकरी आळंदीत आले असल्याचं सांगण्यात येत आहे. इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला आहे.
ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदाच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा निर्बंधमुक्त पार पडला. गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या. समाधी सोहळ्याची सुरुवात किर्तनाने झाली. सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती देवस्थान चे विश्वस्त विकास ढगे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे असे साकडे माऊली चरणी आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी घातले आहे. अवघ्या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हाच खरा वारकरी असून त्याची शेती सुजलाम सुफलाम होवो अशी अपेक्षा देखील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुपार नंतर वारकरी परतीच्या मार्गाला लागतील. खर तर आजचा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा हा वारकाऱ्यांमध्ये नवचेतना आणणारा आहे. या सोहळ्यामुळे अनेक वारकऱ्यांना स्फुर्ती मिळते.