महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागात ‘होर्डिंग्ज’चा 60 कोटीचा घोटाळा
– ‘होर्डिंग्ज’ ची थकबाकी वसूली; परवाना निरीक्षकांच्या घरात
विकास शिंदे
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंग्जचा धंदा जोरदार सुरू आहे. महानगरपालिका हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग्जचे 2 हजाराहून अधिक परवाने अधिकृतरित्या वितरित केलेले आहेत. मात्र, सन 2005 पासून परवानाधारकांची कोट्यवधी रुपयाची थकबाकी वसूल केलेली नाही. पालिकेच्या उत्पन्नावर परवाना निरीक्षकांनी डोळा ठेवून परस्पर शेकडो परवानाधारकांची थकबाकी माफ करीत आर्थिक वाटाघाटी केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने केलेल्या आॅडीटमध्ये आकाशचिन्ह विभागातील परवाना निरीक्षकांकडे सुमारे 60 कोटी रुपयाची वसूली काढण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत आणि परवाना होर्डिंग्जकडे दुर्लक्ष केलेले आहे. शहरात 2 हजार 200 हून अधिक अधिकृत जाहिरात फलक उभारले आहेत. त्यातून महापालिकेला वार्षिक सुमारे 6 कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. परंतू, सन 2005 पासून अधिकृत जाहिरात फलक उभारलेल्या व्यावसायिकांनी कोट्यावधीची थकबाकी भरलेली नाही. त्या व्यावसायिकांना आकाशचिन्ह विभागातील परवाना निरीक्षकांनी थकबाकी न भरण्यासाठी अभय दिले. त्यातून परवाना निरीक्षकांनी व्यावसायिकांशी आर्थिक वाटाघाटी करीत पालिकेच्या उत्पन्नावर डल्ला मारला आहे.
तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागात काम केलेल्या सेवानिवृत्त व विद्यमान परवाना निरीक्षकांनी होर्डिग्ज, किवाॅस, लघू व मध्यम व्यावसायिकांच्या परवानग्या, पेट्रोल पंप, विविध कंपन्याना दिलेल्या परवानग्या आदीसह अन्य व्यावसायांना दिलेल्या परवानगीचे अभिलेख गायब केले आहे. महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने आॅडीट करण्यासाठी मागितलेले रेकार्ड उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यामुळे परवाना निरीक्षकांनी आॅडीट करण्याअगोदरच प्रशासन विभागाकडे अर्ज देवून बदली करण्याची मागणी केलेली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून विविध व्यावसायिकांना परवानगी देवून पालिकेला उत्पन्न मिळवून देणे अपेक्षित असताना पालिकेच्या होर्डिग्जच्या थकबाकी वसूलीवर परवाना निरीक्षकांनी डल्ला मारुन कोट्यावधी रुपयाचे आर्थिक नूकसान केलेले आहे. त्यामुळे 2005 पासून आकाशचिन्ह व परवाना विभागातील सेवानिवृत्त व विद्यमान कर्मचा-यावर जबाबदारी निश्चित करुन कोट्यावधी थकबाकी देणी वसूल करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
‘पांडुरंगा’ने काढली कोट्यवधीची बोगस बिले?
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तत्कालिन मुख्यलिपिक म्हणून कार्यरत असणा-या ‘पांडुरंगा’च्या विरोधात परिचारिकांनी गंभीर आरोप केले. त्या आरोपामुळे महापालिका प्रशासनाने विशाखा समितीकडून चाैकशीचे आदेश दिले. तसेच त्यांची आकाशचिन्ह व परवाना विभागात बदली करण्यात आली. त्या तत्कालिन मुख्यलिपिकाने अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासाठी सुमारे दीड कोटीचे टेंडर काढले होते. मात्र, अनधिकृत होर्डिंग्ज न काढता विद्युत खांबावरील किवाॅस काढून संबंधित जय गणेश एंटरप्रायजेस या ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांची बिले अदा करण्यास मदत केली आहे. ही धक्कादायक बाब महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने केलेल्या आॅडीटमध्ये उघडकीस आली आहे. त्यामुळे संबंधित सेवानिवृत्त मुख्यलिपिकांची जबाबदारी निश्चित करुन पेन्शनमधून वसूल करावीत, अशी मागणी होवू लागली आहे. तसेच संबंधित मुख्यलिपिकाने किवळे, रावेत, पुनावळे, निगडी परिसरात सुमारे 57 होर्डिंग्जचे परवाने वेगवेगळया संस्थाच्या नावे घेवून होर्डिग्ज ठेकेदार बनल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
अनधिकृत होर्डिंग्जमधून पालिकेचा महसूल बुडविला…
शहरात राजकीय नेत्यांनी अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारल्याने महापालिकेचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. होर्डिंग्ज उभारणाऱ्यांना राजकीय नेत्यांचे अभय मिळाल्याने अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढली आहे. अनधिकृत होर्डिंग्जचा शोध घेण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने सर्व्हेक्षण केले. त्यात पालिका हद्दीत सुमारे एकूण 1हजार 768 अनधिकृत होर्डिंग्ज आढळले. त्या होर्डिंग्ज उभारलेल्या जागा मालकांना महापालिकेने नोटीसा बजाविल्या. सात दिवसात जागा मालकांने कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित जागा मालकांवर कारवाई करण्यात येणार होती. मात्र, अद्याप आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाई केलेली नाही.