चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 56 हजारांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/cheating-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कंत्राटदाराकडे आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल. परतावा चांगला मिळेल असे आमिष दाखवून 56 हजार 600 रुपयांची महिलेची फसवणूक केली असल्याचा प्रकार 12 ते 20 मार्च या कालावधीत शिक्रापूर रोड चाकण येथे घडला.
दीपा विनोद खुराणा (वय 68, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप उत्तरेश्वर पवार (रा. चाकण. मूळ रा. बार्शी नाका, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तो रोडवेज सोल्युशन इंदिरा कंपनी कोंढवा या रस्ते बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणा-या कंपनीत कामाला असल्याचे फिर्यादीला सांगितले. रस्ते बनविणा-या मशिनरीच्या कुलंट वैगेरे मेंटेनन्स बघण्याचे काम आम्ही दुस-या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असते. ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे असून त्यांना आर्थिक मदत केल्यास ते आपल्याला चांगला परतावा देतील, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून 56 हजार 600 रुपये घेऊन त्याचा अपहार व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.