शतप्रतिशत भाजपा : आमदार महेश लांडगे यांच्यावर पुणे जिल्ह्यात 6 तालुक्यांतील निवडणुकांची जबाबदारी!
उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर स्ट्रोक’
पुणे । विशेष प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने ‘‘शतप्रति:शत’’ चा नारा दिला असून, जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या 6 तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘‘निवडणूक प्रमुखपदी’’ आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह संभाव्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला आव्हान देण्यासाठी स्थानिक पातळीवर ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ आणि प्रभारी यांची नियुक्ती घोषीत केली. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये पुणे जिल्ह्याचे विभाजन दोन भागांत आहे. उत्तर पुणे जिल्हा (मावळ) आणि दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) तसेच, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र भाजपा संघटनेत जिल्हा म्हणून संबोधले जाते. प्रशासकीय संरचनेमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. 14 नगरपरिषदा, 2 नगरपंचायती आहेत.
संघटनात्मक रचनेमध्ये पुणे उत्तर जिल्हा (मावळ) मध्ये लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर शिरुर, आळंदी, जुन्नर अशा 7 नगरपरिषदा आहेत. मंचर आणि वडगाव या दोन नगरपंचायती आहे. तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या 6 पंचायत समिती आहेत. याचप्रमाणे आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या 6 तालुक्यांचा समावेश पुणे उत्तर जिल्हा (मावळ) आहे. तसेच, पंचायत समितीचे एकूण 76 गण आणि जिल्हा परिषदेचे एकूण 41 गट या जागांवर होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे ‘‘निवडणूक प्रमुख’’ म्हणून सोपवली आहे.
विशेष म्हणजे, 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीने आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता खेचून आणली होती. किंबहुना, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिपंरी-चिंचवडमध्ये लांडगे यांनी 2014 पासून राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची भूमिका ठेवली. तसेच, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत निवडणूक जिंकली होती. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना मोठी ताकद दिली. उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी असली, तरी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीही निर्णायक ‘‘रोल’’ राहणार आहे.
दुसरीकडे, दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) ची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्यावर सोपवली आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी गणेश बिडकर, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी आहे. महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदांच्या नियुक्तीद्वारे संभाव्य ‘गृहकलह’ कमी करण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठींनी केलेला दिसतो.
विकासाभिमूख हिंदुत्वाची व्यापक भूमिका… ( महेश लांडगे )
‘‘हिंदुत्व’’ हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे. हिंदूत्वाचा पुरस्कार करीत विकासाभिमूख कारभार हा भाजपाचा अजेंडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ च्या भूमिकेचा सातत्त्याने उल्लेख केला आहे. याच मुद्याला धरुन आमदार महेश लांडगे यांना उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. कारण, पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उत्तर पुणे जिल्हा ‘‘शिवनेरी’’ म्हणून घोषित करावा, अशी जाहीर मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. त्याला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि भूमिकेचे स्वागत झाले. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्यात आला. त्यामुळे आमदार लांडगे यांची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. 2014 पासून आतापर्यंत म्हणून ‘‘10 वर्षे विश्वासाची.. शाश्वत विकासाची’’ ही टॅगलाईन त्यांनी घेतली. भाजपा सत्ताकाळात ‘‘फ्युचर सिटी पिंपरी-चिंचवड’’ या संकल्पनेतून केलेली विकासकामे ग्रामीण भागात ‘रोल मॉडेल’ म्हणून प्रचार करता यावा. भारतातील सर्वांत मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई कुदळवाडीत झाली. बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी दिलेला यशस्वी न्यायालयीन लढा यामुळे आमदार लांडगेंप्रति शेतकऱ्यांमध्ये आत्मियता आहे. विकास आणि धर्म या दोन ‘लाईन’वर प्रभावीपणे आणि संतुलित चेहरा म्हणून महेश लांडगे समोर येतात. त्यांच्या मदतीने हिंदुत्वाच्या मुद्यावर हक्कांची ‘व्होट बँक’ अधिक सक्षम करता यावी आणि विकासाभिमूख हिंदुत्वाच्या भूमिकेतून शतप्रति:शत भाजपाचे ध्येय पूर्ण करता यावे. यासाठी भाजपाने आमदार लांडगे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडसह व्यापक जबाबदारी सोपवली असावी, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.




