हिंजवडीत शितपेयातून मादक पदार्थ देऊन तरुणीचा विनयभंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/shutterstock_137241875-3-752x501.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शितपेयातून तरुणीला मद्य प्राशन करायला देऊन मित्राने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी परिसरात घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तरुणीने मित्राच्या विरोधात तक्रार दिली. हा प्रकार रविवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास हॉटेल स्पूनजवळ घडला.
राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे (रा. नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम आणि तरुणी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यातूनच दोघेजण हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करायला थांबले होते. त्यांच्यासोबत अन्य एकजण होता. दरम्यान, हॉटेलमध्ये तरुणीला शितपेयातून मद्य प्राशन करायला दिले. तरुणीला नशा चढल्याने सोबतच्या एकाने तिला जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. त्यावेळी मोबाईलमध्ये काढलेले फोटो पतीला दाखवेन, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तसेच, हा प्रकार झाकून न्यायचा असेल, तर शरीर संबंध ठेवण्यास तयार हो, अशीही धमकी दिल्याची तक्रार तरुणीने हिंजवडी पोलिसांत केली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.