स्मार्ट सिटीअंतर्गत पाणी मीटरच्या निविदेत 200 कोटींचा घोटाळा, राष्ट्रवादीचा आरोप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला असून त्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांची साथ आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. एका पाणी मीटरची किंमत 1 लाख 8 हजार रुपये असून ही यंत्रणा कार्यन्वीत करण्यासाठी लागणारा 25 लाख रुपयांचा जनरेटर तब्बल 3 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. या कामासाठी 520 कोटींची निविदा राबविली असून त्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आयुक्तांना केल्याचे शितोळे यांनी सांगितले. त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीच्या टेक महिंद्रा कंपनीला मिळालेल्या कामामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला जात आहे. एका पाणी मीटरची किंमत 1 लाख 8 हजार येवढी आहे. तर, या कामासाठी लागणा-या जनरेटरची बाजारातील किंमत 25 लाख असून पालिकेकडून हा जनरेटर 3 कोटी रुपयांना खरेदी केला जाणार आहे. या कामासाठी 515 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर, 5 वर्षासाठी 5 कोटी रुपये इतका देखभाल दुरूस्तीचा खर्च येणार आहे. यामध्ये 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रशांत शितोळे यांनी केला.
स्मार्ट सिटीच्या सर्वच निविदा संशयास्पद असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत केंद्रातील स्मार्ट सिटीचे प्रमुख कुणालकुमार व राज्याचे प्रमुख नितीन करीर यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराची पुराव्यासह तक्रार राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोकडे करण्यात येणार आहे. तसेच, स्मार्ट सिटी हा देशपातळीवरील सर्वात मोठा भ्रष्टाचार असून त्यात सल्लागार म्हणून केपीएमजी व अँड वाय या दोघांची नेमणूक आहे. याच सल्लागारांनी ठेकेदाराच्या बाजुने करारनामा केल्याचा आरोपही शितोळे यांनी केला.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे उपस्थित होते.