स्थायी समितीची 45 कोटींच्या विकास कामांना मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/pcmc-1-3.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अ,ब,क,ड,ई,फ,ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणा-या अनधिकृत बांधकामावर आणि अतिक्रमणावर कारवाई करण्याकामी विविध प्रकारची यंत्रसामुग्री पुरविण्याकामी येणा-या रक्कम रुपये १ कोटी ८८ लाख खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण ४५ कोटी ६० लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. प्रभाग क्र. १६ मधील रावेत आणि किवळे भागातील स्मशानभुमी मधील दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करण्याकामी २७ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. २० मधील कासारवाडी, कुंदननगर, विशाल थिएटर परिसर, वल्लभनगर, लांडेवाडी आणि उर्वरीत परिसरात वार्षिक ठेकेदारी पध्दतीने मलनि:सारण लाईनची आणि चेंबरची देखभाल दुरुस्ती करण्याकामी २९ लाख रुपये खर्च होणार आहेत.
चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. १० मधील विद्यानगर, दत्तनगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा करणे आणि उर्वरीत ठिकाणी जलनि:सारण विषयक कामे करण्याकामी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. १८ मधील मनपा शाळा इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्याकामी २७ लाख रुपये खर्च होणार आहेत.
क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिस-या टप्प्याची प्रस्तावात नमूद प्रमाणे कामे करण्याच्या कामाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती च्या समवेत करावयाच्या रक्कम रुपये ५ कोटी ७५ लाख अधिक जीएसटीच्या करारनामासाठी १५ टक्के रक्कम रुपये ८६ लाख रुपये आगाऊ स्वरुपात बँक गॅरेंटीसाठी देण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १३ से. क्र २२ मधील जुन्या मधुकर पवळे शाळा इमारतीचे रेट्रोफिंटींग पध्दतीने मजबुतीकरण करण्याकामी २७ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. ०८ मधील उद्यानांमध्ये विद्युत विषयक नुतनीकरणाची कामे करण्याकामी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. ०२ येथील रस्ते सुशोभिकरण अंतर्गत विद्युत विषयक काम करण्यासाठी ३८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. ११ मधील कुदळवाडी शाळा इमारतीची स्थापत्य विषयक सुशोभिकरण कामे करण्यासाठी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी, नाशिक फाटा ते वाकड या रस्त्यावर सेवा वाहिन्यांचे चरांची दुरुस्ती करण्यासाठी एकूण १ कोटी ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. १२ रूपीनगर ते धनगरबाबा मंदीरापर्यंतच्या नाल्याची दुरुस्ती करून उर्वरीत नाला ट्रेनिंग करण्यासाठी ५७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. १५, प्रभाग क्र. १९ आणि प्रभाग क्र. १४ मध्ये आवश्यकतेनुसार जलनि:सारण नलिका सुधारणा विषयक कामे आणि मलनि:सारण नलिका देखभाल दुरुस्तीसाठी ८५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.