स्थायी समितीची 177 कोटींच्या विकासकामांना मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pcmc-1-8.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे १७७ कोटी ७८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण १८३ कोटी ५८ लाख रुपये तूटीपैकी ४० टक्क्याप्रमाणे ७३ कोटी ४३ लाख रुपयांची मागणी केली आहे. नविन बस खरेदीसाठी सन २०२०-२१ मध्ये ९५ कोटी ८३ लाख रुपये एवढी तरतूद उपलब्ध असल्याने खास बाब म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४० कोटी रुपये सन २०२०-२१ च्या अपेक्षीत संचलन तूटीपोटी अग्रीम म्हणून अदा करायचे आहेत. यासाठी शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे पीएमपीएमएलने त्यांच्या आर्थिक ताळेबंदाचे लेखापरिक्षण महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक यांच्या कडून संचलनतूट प्रमाणित करणे आवश्यक आहे. मात्र, एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील अहवाल प्राप्त झालेला नाही. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ मधील तूटीमधून समायोजन करावयाच्या अटीवर संचलन तूटीचे ४० कोटी रुपये पुणे महानगर परिवहन महामंडळाला अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेचे उर्वरित मैलाशुध्दीकरण केंद्रे आणि पंपीग स्टेशनसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीत वीजपुरवठा करणे तसेच रिंगमेनद्वारे जोडणेकामी आवश्यक अनुषंगीक कामे करण्यासाठी ७ कोटी ८६ लाख रुपये तर धावडेवस्ती मधील आरक्षण क्र.४३२ विकसित केले जाणार आहे. यासाठी १२ कोटी ४४ लाख रुपये खर्च होईल. भोसरी स.नं.२१७ येथे आवश्यक क्षमतेचे मैला शुध्दीकरण केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रामुळे पंपीग स्टेशनसाठी लागणा-या वीज वापरामध्ये बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख खर्च होतील. च-होली येथील संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज भेटीवर आधारित समुहशिल्पाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ११ कोटी ९४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
कुदळवाडी- जाधव वाडी भागातुन इंद्रायणी नदीस मिळणा-या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक कामे करुन ३ महिने प्रायोगिक तत्वावर चालविणे तसेच ५ वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ११ कोटी २२ लाख रुपये खर्च होतील. महानगरपालिका हद्दीतील किवळे/रावेत, चिंचवड, पिंपरी वाघेरे, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, निगडी येथील धारण केलेल्या जमिनीवरील अकृषिक बिनशेतसारा आकारणीची गावानिहाय थकबाकीची १ कोटी ७७ लाख ६५ हजार रुपये शासनास अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची स्थापत्य विषयक कामे करण्याकामी २१ लाख रुपये, भोसरी मध्ये करसंकलन इमारती शेजारील मनपाच्या ताब्यातील जागेमध्ये बहुउद्देशीय हॉल बांधण्याकामी ३ कोटी २३ लाख रुपये, से.नं.१,२,३ व इतर ठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी ३५ लाख रुपये, से. नं.४,५,६ आणि इतर ठिकाणच्या रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी ३५ लाख रुपये, नेहरुनगर पिंपरी येथील हिंदुस्थान एन्टीबायोटिक्स कंपनीच्या जागेतून नाला बांधण्याकामी १ कोटी १९ लाख रुपये खर्च होणार आहेत.
साई जीवन शाळे शेजारील मैदान विकसित करण्याकामी ५ कोटी ५० लाख रुपये, मुंबई पुणे महामार्गावरील तसेच बसस्थानकांवरील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे देखभाल, दुरुस्ती करणे व तद्अनुषंगिक कामे करण्यासाठी रक्कम रुपये ८९ लाख खर्च होणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.