सोशल मीडियाद्वारे चालणा-या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
पिंपरी – सोशल मीडियाद्वारे चालणा-या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी मधील एका इमारतीत छापा मारून सात मुलींची सुटका केली. तर पाच जणांना अटक केली आहे.
कुमार बालबहादूर प्रधान (47), रणजित बालबहादूर प्रधान (वय 25, दोघेही रा. मुकाईनगर, हिंजवडी ) शामसुंदर गंगाबहादूर नेवार (वय 23), बळीराम भक्ती शर्मा (वय 22) आणि बळीराम फोन गौर (वय 22, तिघेही रा. आसाम) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये आणखी एक आरोपी असून अद्याप तो फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु आहे. तसेच यासाठी आरोपी सोशल मीडियाचा वापर करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी (दि. 17) रात्री हिंजवडीयेथे गणेश मंदिर परिसरातील इमारतीमधील एका फ्लॅटवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली तर महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील एकूण सात मुलींची सुटका केली. आरोपी सोशल मीडियाद्वारे ग्राहकांशी संपर्क करत. मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून मुली ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम आरोपी करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.